Tiranga Times Maharastra
राज्यातील 29 महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाले असून त्यात मुंबई महापालिकेच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. देशातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेची ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरली होती.
गेल्या चार वर्षांत महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलून गेलं असून या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. ठाकरे बंधूंसाठी ही अस्तित्वाची लढाई होती, तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची परीक्षा होती. अखेर या लढतीत भाजपने बाजी मारत मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवलं आहे.
मुंबईकरांनी महायुतीला कौल दिला असला तरी ठाकरे बंधूंचं नेतृत्व पूर्णपणे नाकारलं नाही, तसंच एकनाथ शिंदेंचं नेतृत्वही संपूर्णपणे स्वीकारलेलं दिसून आलं नाही. मराठीबहुल भागांमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारांनी चांगली कामगिरी करत विजय मिळवला आहे.
या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ 29 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. यामुळे मुंबईत शिंदे गटापेक्षा ठाकरे गट सरस ठरल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
या निकालावर प्रतिक्रिया देताना भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने स्पष्ट शब्दांत मान्य केलं की, मराठी मतदारांमध्ये आजही ठाकरे कुटुंबाचं नेतृत्व अधिक प्रभावी आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये शिवसेनेचा पारंपरिक मतदार आजही ठाकरे गटासोबत असल्याचं या निकालातून दिसून आलं आहे.
